आसावरी
यमाजी सर, धनूचे 'संगीत दहन आख्यान', डावकिनाचा रिच्या, समुद्र, 'शौकीन'मधलं कलकत्ता पान अन दीपाचे पुस्तक 'जग बदलणारे ग्रंथ'....!
आजची संध्याकाळ खूपच आगळीवेगळी....
खूप खूप Happening आणि चिरस्मरणीय म्हणावी अशी 👍
मागच्या वर्षी मार्चमध्ये सुरू झालेला lockdown खऱ्या अर्थानं unlock करणारी!
निमित्त - धनंजय सरदेशपांडे उर्फ धनू लिखित 'संगीत दहन आख्यान'
दीपा, मी अन मेधा, असं तिघींनी मिळून या नाटकाला जायचं ठरवलं होतं. मात्र काही अपरिहार्य कारणांनी मेधा येऊ शकली नाही.
मग मी एकटीच निघाले एरंडवणे येथे पाळंदे कुरियर गल्लीत असलेला 'The Box' स्टुडिओ शोधत.
इप्सित स्थळी पोचल्याबरोबर दीपामुळे यमाजी सरांना प्रत्यक्ष भेटण्याची सुवर्णसंधी मिळाली. 'सकाळ'मध्ये काम करत असताना माझे Senior असलेले संपादक यमाजी मालकर सर दीपाचे मित्र म्हणून भेटले आणि त्या संवादात सगळी औपचारिकता गळून पडली. त्यांच्याशी गप्पा मारून त्यांचा निरोप घेऊन निघालो.
तेवढ्यात डावकिनाचा रिच्या अन त्याची 'प्यारी प्यारी इकलौती' मेघना भेटले. दीपाच्या सांगण्यावरून खास धनूचं नाटक बघायला आलेली ही रसिक जोडी....
त्यांच्याशी गप्पा मारताना नाटकाची वेळ कधी झाली, ते कळलंच नाही.
त्यापुढे एक-दीड तास 'दहन आख्याना'तला लोकगीतांचा ठेका, मार्मिक शब्द अन सगळ्या कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय यात आम्ही सगळेच गुंगून गेलो...
नाटक बघून मन भरलं असलं, तरी नऊ वाजून गेल्याने पोटातले कावळे अंमळ जरा जास्तच कावकाव करायला लागले म्हणून आम्ही आमचा मोर्चा 'समुद्र'कडे वळवला.
तिथे गेल्याबरोबर दीपाने तिच्या जादूच्या पोतडीतून 'जग बदलणारे ग्रंथ' या तिच्या 'मनोविकास'ने कालच प्रकाशित केलेल्या पुस्तकाच्या प्रती काढल्या अन त्यावर तिची मोहक हिरव्या शाईच्या पेनाने लफ्फेदार सही करून त्या मला आणि डावकिनाच्या रिच्याला भेट दिल्या 🤗
तिच्या 'सुपर हिरोज' मुळे आपल्या डोळ्यासमोर असणाऱ्या उत्तुंग व्यक्तिमत्वांचा परिचय झाला,
'जिनिअस' मालिकेत शास्त्रज्ञ मुळापासून समजले,
'कॅनव्हास'मधून जगभरातले सगळे चित्रकार- शिल्पकार भेटले,
'सिम्फनी'मधून पाश्चिमात्य संगीतकार ओळखीचे झाले
'पाथफाईंडर्स'च्या 2 भागातून वेगळ्या वाटेवरचे वाटसरू समजले,
आवडते गुढकथालेखक नारायण धारापही तिच्या पुस्तकातून नव्याने उमगले,
आणि आज तिच्या हातून मिळालेल्या भेटीत 'जग बदलणाऱ्या ग्रंथां'ची तोंडओळख होणार !
अतिशय समर्पक आणि देखणं कव्हर असलेलं, छानच लेआऊट केलेलं हे पुस्तक....
स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेऊन 'शौकीन' मधलं कलकत्ता पान खाल्ल्यावर अन दिपाला कॅबमध्ये बसवल्यावर खरंतर छान समारोप झाला होता आजच्या भेटीचा, गप्पाष्टकाचा!
पण घरी परतत असताना माझे विचार स्कुटीपेक्षा जास्त वेगात धावत राहिले, ते शब्दांत पकडण्याचा प्रयत्न करते आहे.
'मनोविकास'च्या पाटकरांनी काल तिच्या वाढदिवशी, म्हणजे 28 ऑक्टोबरला तिचं पुस्तक -'जग बदलणारे ग्रंथ' प्रकाशित करून खूप मोलाची भेट दिली आम्हा सर्व दीपाच्या 'फॅन क्लब' मेम्बर्सना.
या पुस्तकनिर्मितीच्या काळात तिनं घेतलेली मेहनत खूप जवळून बघितली आहे...
तिचं झपाटलेपण अनुभवलं आहे....
अजिबात कंटाळा न करता आपल्या हातून उत्कृष्ट निर्मिती व्हावी म्हणून तहानभूक हरपून रात्रीचा दिवस करणारी दीपा आता चांगलीच परिचयाची झाली आहे.
14-15 वर्षांपूर्वी 'सकाळ-मधुरांगण' च्या प्रायोजक म्हणून भेटलेल्या दीपा देशमुख मॅडम आणि आजची माझी जिवलग सखी असलेली दीपा....
हा आम्ही सोबत केलेला प्रवास मला सर्वार्थानं खूपच समृद्ध करणारा आहे. तिच्या सहवासात तासंतास कसे निघून जातात कळतच नाही...
तिच्याशी गप्पा मारताना, सोबत गाणी म्हणताना, तिने स्वतः मन लावून केलेल्या चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेताना वेळ पंख लावून भुर्रकन उडून जातो.
अपूर्व आणि अजिंक्यच्या आनंदासाठी धडपड करणारी आई,
रिद्धी आणि रिहानचे लाड करणारी आजी,
एकदा आपलं म्हटलं, की मग कायम सर्व प्रसंगात खंबीरपणे साथ देणारी सखी,
कुठल्याही अंधश्रद्धेला थारा न देता स्वतःच्या विज्ञानवादी मतांवर ठाम असणारी विचारवंत,
सुरेल गायिका,
वैभवच्या कविता एकदा ऐकल्यावर लगेच पाठ करणारी आणि तालासुरात गायला तयार असणारी कविताप्रेमी,
कॉटनच्या साड्यांवर मनापासून प्रेम करणारी, स्वतःबरोबर मैत्रिणीसाठीही आवर्जून कपडे खरेदी करणारी-समोरच्याची आवड निवड लक्षात ठेवून तशा भेटवस्तू प्रत्येकाला देणारी जिवलग,
स्वतःची मतं मोकळेपणी अन प्रसंगी परखड शब्दात समोरच्यापर्यंत पोचवणारी स्पष्टवक्ती,
स्वतः बघितलेले चित्रपट, वाचलेली पुस्तकं सगळ्यांपर्यंत खुमासदार शैलीत पोचवणारी लेखिका,
स्वच्छता अन टापटीप आवडणारी, अभिरुचीसंपन्न सौंदर्यदृष्टी असलेली नवयौवना, (नवयौवनाच कारण याबाबतीतला तिचा उत्साह नवथर तरुणींनाही लाजवणारा)...
मनात अन डोळ्यात कुतूहल कायम जागं असलेली उत्साही, निरागस, खोडकर, खट्याळ शाळकरी मुलगी.....
कुठलाच विषय अन भाषा वर्ज्य नसलेली, मराठी, हिंदी, इंग्रजी बरोबरच जगभरातल्या कुठल्याही भाषेतल्या चित्रपटांचा आस्वाद घेणारी चित्रपटप्रेमी....
स्वतःचे ब्लाऊज स्वतःच शिवणारी, साड्या घेतल्याबरोबर लगेचच फॉल-पिकोही स्वतःच्या हाताने घरीच करणारी तत्पर मुलगी....
पारंपारिक पदार्थांबरोबरच You-tube वर बघून, शोधून नवनवीन पदार्थ करणारी सुगरण...
हाडाची वाचक आणि बहुआयामी लेखक....
अतिशय संवेदनशील आणि सगळ्यांना जमेल ती, शक्य तेवढी सगळी मदत करणारी सहृदय व्यक्ती....
प्रत्येक फॅन अन वाचकाला आपुलकीने आपलंसं करणारी....
नवख्या लेखक अन कवींना प्रोत्साहनपर मार्गदर्शन करणारी....
प्रत्येकातलं वेगळेपण टिपून ते त्या त्या व्यक्तीचं बलस्थान व्हावं म्हणून मनापासून प्रयत्न करणारी.....
वय, जात, धर्म, लिंग, आर्थिक-सामाजिक स्थिती या सर्वांपलीकडे जाऊन सगळ्यांशी मनमोकळा संवाद साधणारी......
सामाजिक बांधिलकीचं पुरेपूर भान असणारी आणि ती जबाबदारी यथायोग्य पार पडणारी....
एवढं सगळं लिहूनही जिची ओळख परिपूर्ण झाली, असं वाटतच नाही, काहीतरी राहून गेल्याची जाणीव बोचत राहते, अशी माझी प्रिय सखी दीपा!
मागच्या वर्षी तुझ्या वाढदिवसाच्या आदल्या रात्री आपण एकत्र होतो.
यावर्षी वाढदिवस झाल्यावर दुसऱ्या दिवशीच्या रात्री एकत्र धमाल केली.
पुढच्या वर्षी नक्की कुठला दिवस साधायचा ग?
ते पुढच्या वर्षी ठरवू.... 😊
तोवर अशीच संधी मिळेल तेव्हा, कायम एकत्र राहूया, भेटत राहूया, बोलत राहूया, (माझा matching sense सुधारण्याचाही प्रयत्न करत राहूया 😁😛)....
तू अशीच लिहीत राहा आणि आम्हाला तुझ्या दर वाढदिवसाला तुझं एक नवीन पुस्तक भेट देत राहा.
खूप खूप खूप खूsssssssssप मोठी हो सखे!
आणि तू कितीही उंची गाठलीस, तरी तुझे पाय ठामपणे जमिनीवरच असतील याची मला , आम्हाला, तुला ओळखणाऱ्या प्रत्येकाला 100% खात्री आहे.
- आसावरी