कल्याण टांकसाळे  

कल्याण टांकसाळे  

अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख यांच्या ७२ ‘जीनिअस’ व्यक्तींच्या मालिकेतल्या दुसऱ्या टप्प्यातल्या १२ प्रभावशाली ‘भारतीय जीनिअस’ व्यक्ती दिवाळीत तीन संचात बाजारात येवून दाखल झाल्या आहेत. या दोन्ही लेखकांनी यापूर्वीही एकत्रित काही पुस्तकं लिहिली आहेत. ‘भारतीय जीनिअस’ व्यक्तीच्या निमित्ताने भारताच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यात, त्यांच्या संशोधनात आणि त्यांच्या कार्यात डोकावून पाहण्याची अनोखी संधी मराठी वाचकांना मिळणार आहे. प्रचंड कुतूहल असलेल्या अच्युत गोडबोले यांचा अनेक विषयांत मुशाफिरी करत त्या त्या विषयातल्या अवघड आणि क्लिष्ट मुलभूत संकल्पना सोप्या शब्दांत प्रवाही पद्धतीने सांगण्यात हातखंडा आहे. त्यांच्यासोबत भारतीय जीनिअसचं सहलेखन करणाऱ्या दीपा देशमुख या देखील संवेदनशील लेखक/कार्यकर्त्या असून व्यक्तीचित्रण रेखाटण्यात त्या कुशल आहेत. त्यामुळे, या दिवाळीला तब्बल बारा भारतीय जीनिअस व्यक्तींचं आयुष्य, त्यांच्या समोरच्या समस्या, त्यातून मार्ग काढण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, त्या प्रवासातल्या गंमती जमती, संशोधन, काम आणि त्यांचं कर्तुत्व, त्यांना आलेलं यश आणि प्रसंगी सहन करायला लागलेली अवहेलना असा सगळा पटच या पुस्तकाच्या निमित्ताने उलगडला गेला आहे.    
गणित, विज्ञान, इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, शेती, इतिहास अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत आपल्या प्रतिभेच्या जोरावर ज्यांनी भारताला जगाच्या पाठीवर मानाचं स्थान निर्माण करून दिलं अशा तब्बल १२ जीनिअस व्यक्तीच्या चरित्रांचा, संशोधनाचा आणि कार्याचा या पुस्तकांत समावेश केलेला आहे. पहिल्या भागात आर्यभट्ट, भास्कराचार्य आणि ब्रम्ह्गुप्त अशा प्राचीन भारतीयांसोबतच अद्भुत प्रतिभेचे इंजिनिअर सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या, थोर गणिती श्रीनिवास रामानुजन आणि विज्ञानाबरोबरच इतिहासाचेही गाढे अभ्यासक असलेले डी.डी. कोसंबी यांचा समावेश आहे. तर दुसऱ्या भागांत वनस्पतीनाही चेतना असतात असं दाखवून देणारे जगदीशचंद्र बोस, भारतीय अणूउर्जेचे जनक डॉ. होमी भाभा, हरितक्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामिनाथन, आणि ज्यांना आर्किटेक्चरमधला गांधी म्हणून ओळखलं जातं ते लॉरी बेकर यांचा जीवनपट उलगडला आहे. तिसरा भाग डॉ. सी. व्ही.रामन, मेघनाद साहा, चंद्रशेखर आणि डॉ. जयंत नारळीकर यांच्याविषयी आहे. 
शाळेच्या अभ्यासक्रमांत यातले काही जीनिअस आपल्याला संक्षिप्त रुपात भेटले आहेत. पण अनेकांची आपल्याला फारशी माहितीही नाही . अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख यांनी हे सगळे जीनिअस आपल्याला माहिती आहेत त्याहून कितीतरी जास्त अद्भुत, अफाट आणि अचाट होते याची प्रचीती या पुस्तकाद्व्रारे दिली आहे.
अतिशय प्रतिकूल परिस्थितीत या सर्व मंडळीनी आपलं संशोधन पूर्ण केलं. त्या काळी साधन-सुविधांची तर वानवा होतीच; पण त्यांतील अनेकांना इथल्या समाजव्यवस्थेचे पण चटके सहन करावे लागले. अपार बुद्धिमत्तेचं वरदान त्यांना लाभलेलं होतं आणि मोठ्या कष्टानं आणि शिस्तीनं त्यांनी त्यांची क्षमता फुलवली. विज्ञान, साहित्य आणि  कला अशा अनेक विषयांतही त्यांनी मुशाफिरी केली. अनेक मुलभूत शोध तर ते लावू शकलेच, पण त्यांनी देशाला उभारणी देणाऱ्या अनेक महत्वाच्या संस्था देखील उभ्या केल्या. आपापल्या क्षेत्रातल्या कामांना दिशा देवून भावी पिढ्यांसाठी ते प्रेरणेचा अखंड स्त्रोत झाले. त्यामुळे त्यांचं काम, त्यांचं व्यक्तिमत्व आणि त्या-त्या काळातली परिस्थिती, त्यांना भेटलेली माणसं, हे सारं खोलात जावून मुद्दाम समजून घेतलं पाहिजे. ही पुस्तकं नेमकी याच बाबतीत मदत करतात.
डॉ. होमी भाभा लहान असताना रात्रभर रडायचे. डॉक्टरांनी सांगितलं हा मुलगा खूप बुद्धिमान आहे, त्याला खूप झोप लागतच नाही. त्यामुळे त्या पाळण्यातल्या बाळाला ऐकायला गाणी लावून द्यावी लागत. परपुरुषाचं तोंड देखील पहायची परवानगी नसलेल्या महिला जगदीशचंद्र बोस यांना भेटण्यासाठी आवर्जून बोलावून घ्यायच्या. हरितक्रांतीचे जनक स्वामिनाथन बाजारात भाजी आणायला गेले की घाट्याचा सौदा करून येतात असं त्यांच्या मुलीला वाटतं. ऐंशी वर्षांचे विश्वेश्वरेय्या एका यंत्रांच कार्य समजून घेण्यासाठी नाजूक शिडी चढून काहीशे फुट यंत्राच्या वर जातात, तर दिल्लीला जाण्यायेण्याचा वायफळ खर्च नको म्हणून लॉरी बेकर त्याच खर्चात प्रकाशित होईल असं पुस्तक लिहून राष्ट्रपतीना पाठवून देतात. अशा असंख्य अचंबित करणारे किस्से गोडबोले आणि देशमुख यांच्या या पुस्तकांमध्ये  वाचायला मिळतात. आपल्याही न कळत ते आपल्याला क्षणभर या जीनिअस लोकांच्या आयुष्याचा साक्षीदार बनवतात. वाटतं, अरे हे सगळं कसं आपल्या समोर घडतंय... स्तिमित करणाऱ्या या जीनिअस मंडळींच्या गोष्टी आपल्याला पानापानावर अचंबित करतात आणि भारावून देखील टाकतात. समृद्धतेकडे वाटचाल करणारे सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, गृहिणी आणि कुतूहल असणाऱ्या प्रत्येक व्यक्ती यांनी ही पुस्तकं वाचायलाच हवीत.
खरं भारावलेपण आहे ते या पुस्तकाच्या निमित्ताने समोर येणाऱ्या ‘भारतीय’ नावाच्या भारतीयत्वामध्ये. हे जीनियस भारतात जन्माला आले, इथे लहानाचे मोठे झाले म्हणून तर ते भारतीय होतेच; पण त्यांचं भारतीयत्व उलगडत जातं ते त्यांनी केलेल्या कामातून. स्वामिनाथन यांना भारतातलं दारिद्य आणि भूक खुणावत होती. लॉरी बेकरनां इथल्या गरीबातल्या गरीब माणसांला सुद्धा हक्काचं घर मिळालं पाहिजे याची तळमळ होती. जगभर संशोधन करण्यात आणि भौतिकशास्त्र शिकवण्यातच ज्यांना आपलं सगळं आयुष्य व्यतीत करता आलं असतं, त्या डॉ. नारळीकरांना  मराठी मुलांसाठी मराठीतून विज्ञान कथा लिहाव्याशा वाटल्या. आणि सी.व्ही. रामन नोबेल पारितोषिक मिळाल्यानंतर आज माझ्यासमोर माझ्या स्वतंत्र भारताचा राष्ट्रध्वज नाही, तर युनियन जॅक आहे याची खंत वाटली. त्या त्या काळातली भारताची गरज ओळखून, ती पूर्ण करण्यासाठी, या सर्वांनी आपली प्रतिभा पणाला लावली म्हणून ते खरे जीनिअस ठरतात. अशा अर्थानंही जीनिअस होता येतं हे या पुस्तकाच्या निमित्ताने आपल्याला भावलं तर जगातल्या अनेक प्रश्नांची उकल करून, माणसाचं जगणं सुकर करण्याचे मार्ग दिसू लागतील. 

कल्याण टांकसाळे 
kalyantanksale@gmail.com                               

भारतीय जीनियस
लेखक : अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख 
प्रकाशक : मनोविकास प्रकाशन
तीन संच प्रत्येकी मूल्य रु ९९/-