सुनील बडूरकर

सुनील बडूरकर

सरस वाचक चळवळ मागील सात वर्ष सुरु आहे.

त्यासोबत सरस भारत व्याख्यानमाला आणि संमलने, बैठका, परिषदा असे अनेक वैचारिक सांस्कृतिक उपक्रम अनेक वर्ष चालू आहेत.

उस्मानाबाद परिसरात नवीन वाचक नवीन श्रोते नवीन रसिक घडण्यात या दहा वर्षाचा मोठा इतिहास आहे.

मागच्या कांही वर्षात उस्मानाबाद येथे डॉ सदानंद मोरे, उत्तम कांबळे, राजन गवस, शारदा साठे, विद्या बाळ, दिनकर गांगल, रावसाहेब कसबे, कॉ शरद पाटील, कुमार केतकर, इंद्रजीत भालेराव, कुमार शिराळकर, अजित अभ्यंकर, दत्ता देसाई, डॉ. आ.ह. साळुंके, शरद तांदळे, सयाजी शिंदे, याशिवाय अनेक वक्ते, विचारवन्त, कार्यकर्ते, लेखक, कवी हक्काने प्रेमाने आलेले आहेत. आवर्जून आठवण ठेवून पुन्हा पुन्हा भेटी घेत आलेले आहेत. उस्मानाबाद शहर तालुका जिल्हा वैज्ञानिक सांस्कृतिक वैचारिक दृष्ट्या समृद्ध होत गेला आहे.

याच संस्कारांना पुढे नेत कोरोना नंतर पुन्हा एकदा या परिसरात मंथन सुरु झालेले आहे.

मागच्या तीन महिन्यात उस्मानाबाद येथे लेखक कवींचे तीन संमलेने झाली. लहान मोठे कार्यक्रम झाले. इतके होत असताना संयोजक आणि रसिकांना दमछाक झाली असेल. त्यात शाळा उघडल्या जात आहेत, पालक एडमिशन च्या मागे धावत आहेत, पुणे लातूर, बारामती, इत्यादी ठिकाणी चकरा मारत आहेत, मध्येच पावसाने सुरुवात केली. निम्मा भाग शेती करतो त्यामुळे गावाकडे शेताकडे लगबग गडबड सूर झाली. अशा दाटणीत विज्ञान विषयक पुस्तकांवर त्याच्या प्रभावावर चर्चा आयोजित करणे मोठे रिस्की ठरते. पण नव्या वळणावर पुढे जायचे तर एखादा टप्पा असा येतो. महाराष्ट्रातील बाकी लोक जोडणे लेखक प्रकाशक जोडणे याला अनन्य साधारण महत्व आहे. या भूमिकेतून आम्ही मित्रांनी दीपा देशमुख यांचा दौरा आखणी करण्याचे ठरवले. तारीख, तयारी, हॉल, मनुष्यबळ अशा अनेक अडचणी अचानक आल्या. त्यात फक्त आपला स्वार्थ नको तर बाजूच्या गावात देखील त्यांनी जावे असा प्रयत्न केला . लातूर च्या मित्रांनी साद ऐकली. म्हणजे एका मोठ्या भागात हा प्रभाव जाणार ही खात्री झाली.

सगळेजण कामात आणि अडचणीत पण सगळे जण उत्सुक आणि तत्पर त्यामुळे दीपा देशमुख यांचा दिनांक २५ जून २०२२ चा संध्याकाळचा कार्यक्रम अत्यन्त आनंददायी, संस्मरणीय आणि प्रेरणादायी ठरला.

दीपा देशमुख यांचा अभ्यास आणि कष्ट यामधून साकार झालेले दहा बारा पुस्तकांबद्दल सत्तर मिनिटात मांडणी करणे हे एक मोठे आव्हान होते. पण मन भरून यावे असे ओघवते संभाषण त्यांनी केले. त्याला आम्ही व्याख्यान म्हणणार नाही, तो एक सरळ उत्कट संवादच होता.

याच सुमारास विक्रीस ठेवलेले ७० टक्के पुस्तके फक्त वीस मिनिटात संपली.

उस्मानाबाद येथे दीपा देशमुख आल्या आणि ऐन पावसाळ्यात त्यांनी नवीन पेरणी केली.

या भूमीत त्यातून विज्ञान संस्कार पीक मायंदळ येईल !

दीपा देशमुख आणि अरविंद पाटकर यांचे आभार.

@ सुनील बडूरकर