वाचनप्रेमी
काही दिवसांपूर्वी माझ्या आवडत्या लेखिकेपैकी एक असलेल्या दिपा देशमुख मॅम यांना प्रथमच घरी जाऊन भेटलो . आपण ज्यांची पुस्तकं वाचतो , ज्यांच्या लिखाणातून विचारांना नवी दिशा मिळते, अशा लेखकांना प्रत्यक्ष भेटणं हा खरोखर खास नि आनंदाचा क्षण असतो.
जग बदलणारे ग्रंथ हे त्यांचं अप्रतिम पुस्तक वाचल्यानंतर त्यांना भेटायची एक मनापासून इच्छा मनात होती... नि ती इच्छा प्रत्यक्षात उतरली...
काही दिवसांपूर्वी मॅमना मेसेज करून रविवारी भेटायला येईन असं सांगितलं त्यांनी कोणताही औपचारिकपणा न ठेवता लगेच पूर्ण address पाठवला. मी समीर भाईसोबत सायंकाळी 4 वाजता त्यांच्या घरी पोहोचलो. घरी पोहोचताच मॅमने अतिशय प्रेमाने स्वागत केलं. आंब्याचा थंडगार पन्ह दिला... नि विशेष म्हणजे त्यांच्या दोन पुस्तकांची भेट दिली... त्या क्षणी एक वाचक म्हणून मन खूप भरून आलं. हा क्षण माझ्यासाठी खूप खास होता. एखाद्या लेखकाकडून थेट पुस्तक भेट मिळणं म्हणजे केवळ पुस्तक मिळणं नसतं तर त्यामागे असलेली प्रेरणा, विश्वास नि वाचनाचा वारसा आपल्यापर्यंत पोहोचतो.
मॅमना पुढे दुसऱ्या ठिकाणी जायचं होतं, पण त्यांनी आम्हालाही सोबत येण्याचं प्रेमाने आमंत्रण दिलं. आम्ही त्यांच्या सोबत गेलो, तेथे प्रियदर्शन दादा नि इतर काही सुंदर माणसांची ओळख झाली. त्या वातावरणात पुस्तकं, विचार, निसर्ग, अनुभव नि आयुष्याबद्दल चाललेले संवाद ऐकताना असं वाटत होतं की आपण एखाद्या जिवंत पुस्तकातच बसलो आहोत...
रात्री सोबत वनभोजन केलं... नि त्या शांत वेळेत मॅमसोबत मनमोकळेपणाने विविध विषयांवर चर्चा झाली. त्यांच्या लेखन प्रवासाबद्दल जाणून घेतलं, We Read च्या प्रवासाबद्दल सांगितलं... नि त्यांच्या येणाऱ्या आगामी पुस्तकाबद्दल ऐकताना एक वाचक म्हणून वेगळीच उत्सुकता निर्माण झाली. त्या पुस्तकामागचा विचार नि दिशा ऐकून खूप आनंद झाला.
सायंकाळी 4 पासून रात्री 10 पर्यंत मॅमच्या सानिध्यात राहण्याची संधी मिळाली... नि त्या काही तासांत त्यांनी दिलेली आपुलकी, साधेपणा नि प्रेम... यामुळे कधीच असं वाटलं नाही की ही आमची पहिलीच भेट आहे. त्यांच्या बोलण्यात, वागण्यात नि विचारांमध्ये एक वेगळीच उब आहे... जी फक्त लेखकाची नाही, तर माणुसकी जपणाऱ्या व्यक्तीची आहे.
मॅम यांचं जग बदलणारे ग्रंथ हे पुस्तक माझ्या अत्यंत आवडत्या पुस्तकांपैकी एक आहे. जगातल्या महत्त्वाच्या विचारधारांना नि समाजाला दिशा देणाऱ्या पुस्तकांची ओळख करून देताना त्यांनी खूप सुंदर नि समजण्यास सोप्या पद्धतीने मांडणी केली आहे. त्या पुस्तकामुळे अनेक नवीन ग्रंथांविषयी जाणून घेण्याची आणि अधिक वाचण्याची प्रेरणा मला मिळाली.
अशा भेटी आपल्याला पुन्हा पुन्हा आठवण करून देतात की वाचन हा केवळ छंद नसून तो विचार समृद्ध करणारा आणि आयुष्य बदलणारा प्रवास आहे. अशा लेखकांना भेटणं आणि त्यांच्याकडून प्रेरणा मिळणं हीच वाचनप्रेमी म्हणून सर्वात मोठी भेट असते. 📚❤️